
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे साहित्य संमेलन मोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी (जय गणेश बँक्वेट हॉल) बीआरटी रोड, मोशी येथे रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी ९ वाजता, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ न. म. जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सीमा सागर काळभोर, स्वागत अध्यक्ष निलेश उद्धव बोराटे, संस्थेचे सचिव रामभाऊ सासवडे, कार्याध्यक्ष सोपान खुडे, डॉ. पौर्णिमा कोल्हे, योगेश कोंढाळकर, राजेश बोराटे, अशोक ढोकले, दामोदर वहिले, श्रीहरी तापकीर, माणिक सस्ते, सुनील जाधव, अलंकार हिंगे, काळूराम दामू सस्ते, गणेश शशिकांत सस्ते, प्रा. संगीता थोरात, तेजस्विनी देशमुख आदी उपस्थित होते. या एक दवसीय साहित्य संमेलन उद्घाटनच्या दिवशी सकाळी ८ वाजता मोशी गावाचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर येथून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी पर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. सकाळी ९ वाजता, ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे आदींसह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवन चरित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता, आजची युवा पिढी आणि साहित्य प्रवाह हे चर्चासत्र प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये सचिन बेंडभर, तेजस्विनी देशमुख, रसिका सस्ते, मीनाक्षी पाटोळे आदी सहभाग घेणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु