
रायगड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
स्थानिक राजकारणात मोठा राजकीय उलथापालथ घडवत भाजपच्या माजी नगरसेविका तथा लोकप्रिय महिला नेत्या बिनिता घुमरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेले हे प्रवेश सोहळे राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
घुमरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला कर्जत शहरात नवसंजीवनी मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. गेल्या काही वर्षांत घुमरे यांनी आपल्या प्रामाणिक कामामुळे आणि सेवाभावी भूमिकेमुळे महिलांत तसेच नवतरुणांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक संघटनांमध्ये खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
कार्यक्रमात बोलताना बिनिता घुमरे म्हणाल्या, “कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि सकारात्मक नेतृत्वाची गरज आहे. अजितदादांच्या गतिमान नेतृत्वावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादीच्या परिवारात दाखल होत आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीचा प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी अर्पण असेल.” त्यांच्या या भावनिक निवेदनाने उपस्थितांमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घुमरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत सांगितले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये त्यांच्या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडीबद्दल संभ्रम, नाराजी आणि आश्चर्याचे सूर ऐकू येत आहेत. काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “अलीकडील काळात पक्षात संवादाचा अभाव निर्माण झाला होता,” म्हणूनच हा निर्णय अनपेक्षित नसल्याचे ते म्हणतात.
बिनिता घुमरे यांच्या पक्षांतरणाने कर्जत तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून येत्या दिवसांत या घडामोडींचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके