
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्षअंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जनजातीय गौरव दिन व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियोजनभवनात झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचा शुभारंभ गुजरातमध्ये झाला, त्याचे थेट प्रक्षेपण नियोजनभवनात करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार वसंत खंडेलवाल, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनजातीय वर्ष’म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी धरती आबा कार्यक्रम देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी जनजातीय गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांच्या हस्ते झाले. आदिवासी जननायकांचे चरित्र, त्यांचे कार्यकर्तृत्व दर्शविणा-या चित्रांचे प्रदर्शन, तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या अनेक सुंदर चित्रांचे व प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचा शुभारंभही केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांच्या हस्ते झाला. विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्यकला सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे