
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाने राज्यात मोठी संघटनात्मक हालचाल केली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीत गती, समन्वय वाढवणे आणि जिल्हास्तरावर निवडणूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एकूण ४७ जिल्ह्यांसाठी समन्वयकांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड (अकोला) यांची बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देणे, स्थानिक पातळीवरील समन्वय वाढवणे आणि नियोजन अधिक प्रभावीपणे राबवणे यासाठी ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, नव्या नियुक्त्या पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी निर्णायक ठरणार असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतील. मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे