
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी येथील नागरिकांना परिवहन मंडळाच्या अनियमित बससेवेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू असताना बस गावात नियमित येतात. पण शाळांना सुट्टी लागली की, या बसफेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा अवलंब करावा लागतो आणि दुप्पट भाडे मोजण्याची वेळ येते.
मध्य प्रदेश सीमेलगत असलेले चिंचोली गवळी हे सात ते आठ हजारांची लोकसंख्या असलेले मोठे केंद्र आहे. दुग्धजन्य उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील गवळी समाजबांधवांना दूध-दही विक्रीसाठी मोर्शीसारख्या शहरी भागात रोज जावे लागते. मात्र बससेवा बंद असल्याने त्यांना असुरक्षित आणि महागड्या खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिलांना निम्म्या दरात प्रवाससुविधा दिल्या असल्या, तरी या सुविधा चिंचोली गावातील लोकांना मिळतच नाहीत. मोर्शीमध्ये तहसील, बँका, सरकारी योजना, न्यायालय, बाजारपेठ तसेच आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने गावकऱ्यांना प्रत्येक कामासाठी शहरात जाणे अपरिहार्य ठरते. आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते.
शाळा सुरू असताना चिंचोली ते मोर्शी प्रवास फक्त १० रुपयांत होत असे; परंतु सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्यात आणि इतर सुट्टीच्या काळात बससेवा बंद राहते. आता खासगी वाहनांनी त्याच प्रवासासाठी नागरिकांना ५० ते ६० रुपये खर्च करावे लागत आहेत.
ग्रामीण जनतेने सुट्ट्यांच्या काळातही बसफेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात, चिंचोली–मोर्शी मार्गावर किमान तीन फेऱ्या दररोज उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे. ग्रामीण भागातील लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून ही बससेवा तात्काळ सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी