
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त होऊ लागली आहेत. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
माननीय. आयुक्त, यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज दिनांक १४ नोव्हेंबर,२०२५ रोजी जेसीपी व चार ट्रक द्वारे जमील कॉलनी मुख्य रस्ता ते ताज नगर पुलापर्यंत वलगाव रोड, येथील असलेले फुटपाथ वरील लोखंडी शेड, काँक्रीट ओटे, अवैध लोखंडी खोके, बल्लीबासे लावून टिनाचे झोपड्या असलेले, सदर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त, यांनी दिल्या. या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त,यांनी सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी