प्रत्येक रुपया आता हिशोबात; निवडणूक विभागाचे नवे दरपत्रक जाहीर  
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये खर्चमर्यादा तुलनेने कमी असली, तरी उमेदवार अनेक प्रकारचे खर्च करीत असल्याने त्यांची आर्थिक मोकळीक अधिक जाणवत होती. मात्र आता निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या काटेकोर दरपत्रकाम
प्रत्येक रुपया आता हिशोबात! निवडणूक विभागाचे नवे दरपत्रक जाहीर  पाण्याची बॉटल १३ रुपये, नाष्टा २० रुपये, शाकाहारी जेवण १६० रुपये


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये खर्चमर्यादा तुलनेने कमी असली, तरी उमेदवार अनेक प्रकारचे खर्च करीत असल्याने त्यांची आर्थिक मोकळीक अधिक जाणवत होती. मात्र आता निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या काटेकोर दरपत्रकामुळे उमेदवारांना प्रचारात ‘हात आवरता’ घ्यावा लागणार आहे. कोणताही खर्च हा विभागाने निश्चित केलेल्या दरानुसारच दाखल करावा लागणार असल्याने उमेदवारांचे आर्थिक गणित पूर्णपणे बदलणार आहे.

जिल्ह्यातील १० नगर परिषद व २ नगरपंचायतींसाठी ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू झाली असून, त्याच दिवसापासून उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदणी अनिवार्य झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर खर्च नोंदवहीत प्रत्येक खर्चाची पावतीसह नोंद करणे बंधनकारक आहे. अंतिमतः हा खर्च निवडणूक खर्च कक्षात सादर केला जातो.

दरपत्रकात पाण्याची बॉटल १३ रुपये, नाष्टा २० रुपये, शाकाहारी जेवण १६० रुपये तर सामिष भोजन २५० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच स्वागत गेट १२०० रुपये प्रति नग, गादी १५ रुपये, पोडीयम १०० रुपये, शामियाना १० रुपये प्रति चौरस फुट, डोम ३५ रुपये चौरस फुट, बुके २०० रुपये, स्टँड फॅन २५० ते ३00 रुपये, साऊंड सिस्टीम १५०० रुपये, बॅनर १८ रुपये फूट, झेंडे २५ रुपये, तर कापडी टोपी २५ रुपये असा खर्च नोंदवावा लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक बाजारभाव, भाडे व विविध सेवांच्या प्रचलित दरांचा अभ्यास करून तसेच राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून हे दरपत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर कडक अंकुश येणार असून प्रचारातील फुशारकीपेक्षा पारदर्शकतेला प्राधान्य मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande