
सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। फेब्रुवारी २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ६५८ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. डिसेंबरमध्ये त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, एका नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी डिसेंबरअखेर मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात जानेवारीत महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर लगेचच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. काही दिवसांचा विलंब झाल्यास सध्याच्या सरपंचांना मुदतवाढ किंवा तेवढ्या काळासाठी प्रशासक नेमला जाऊ शकतो. दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड