
मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.) - श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी आयोजन केले आहे. जांभोरी मैदान, वरळी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी श्रीनारायण महायज्ञाचे आयोजन होणार आहे ज्यामध्ये देशविदेशातून साधुसंत येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी हिंदू संमेलन होणार आहे, अशी माहिती प्रेस क्लब, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य श्री. दिनेश फलाहारी महाराजांनी दिली. यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.पराग फडणीस आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. शंकर वराडकर उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने पत्रकार परिषदेत वक्ते पुढे म्हणाले की, 'मुघलांनी तलवारीच्या जोरावर या भूमीवर अनधिकृत ताबा मिळवला होता. परंतु आम्हाला सर्व सनातनींना श्रद्धा आहे आणि न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालयाच्या सहकार्याने आणि आपल्या विचारांच्या आणि शब्दांची ताकद वापरून ही लढाई निश्चितच जिंकू. हा यज्ञ महाराष्ट्राच्या वीरभूमीवर होत आहे. आम्ही भगवान श्री विष्णूंच्या चरणी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी लवकरच मुक्त होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.'
सन १०१७ मध्ये महमूद गजनबी, १२५० मध्ये फिरोज तुगलक, १४९० मध्ये सिकंदर लोधी आणि १६७० मध्ये औरंगजेबने आपले कृष्ण मंदिर तोडले होते, परंतु हिंदू राजांनी कधीही आपले धैर्य सोडले नाही. मुघल शासक मंदिर तोडत राहिले आणि आपले हिंदू राजा मंदिर बनवत राहिले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये षडयंत्र करून न्यायालयामार्फत एक असा निकाल देण्यात आला की मंदिरच्या बाजूला जिथे मशीद आहे ती तशीच राहील, परंतु आम्ही याला न्यायालयात आव्हान दिले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, प्राचीन तथ्यांना विचारात घेऊन न्यायालय हिंदू समाजाला न्याय देईल. भगवंताच्या कृपेने ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये श्रीराम दरबार संपन्न झाला आहे त्याच प्रकारे मथुरेमध्येही भगवान श्रीकृष्णांचे भव्य आणि दिव्य मंदिर लवकरच बनेल !', असे श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पूज्य श्री दिनेश फलाहारी महाराज यांनी असा प्रण घेतला आहे की, जोपर्यंत श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत ते अन्नप्राशन करणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी