
ठाणे, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाण्यात जेथे कुत्रे-मांजरींसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतात, तेथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्वप्निल स्थळ उभे राहिले आहे. आजार, अपघात किंवा वयाच्या ओझ्याने या निष्ठावान साथीदारांचा मृत्यू झाल्यास, त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निरोप देण्यासाठी आधी नसलेली अडचण आता इतिहास झाली. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेने माजीवाडा (ठाणे) येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली गॅसदायनी स्मशानभूमी, मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते. या स्थळी पाळीव प्राण्यांसाठी विशेष स्मशानभूमी बांधून, त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे.
या प्राणी स्मशानभूमीची लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम माजी नगरसेवक संजय भोईर ठाण्यातील प्राणी मित्र संघटनेच्या सोनाली सजननी यांच्या सह अनेक प्राणी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्मशानभूमीचे वैशिष्ट्य म्हणजे APC तंत्रज्ञानाने सजवलेली ३० मीटर उंच चिमणी, जी ७० टक्के प्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करते – जणू हिरवी शांतता वाहणारा एक धुरळा-मुक्त मार्ग! आवारात अद्ययावत बैठक व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस, महिला-पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचे मनमोहक मंदिर, हे सर्व एकत्र येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत निरोप देण्याची काळजी घेते. मंत्री सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनाने, हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून, प्राणीप्रेमाची एक अमर कहाणी बनले आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनाईक यांच्या शुभहस्ते, या अद्यावत स्मशानभूमीचे शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी भव्य लोकार्पण झाले. प्राणीप्रेमींच्या गर्दीने सजलेल्या या सोहळ्यात, मुक्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे, ज्याने प्राणी प्रेमींच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू ढळले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर