
नांदेड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पुढील प्रक्रियेअंतर्गत विद्यालयाला नवीन इमारत उपलब्ध होऊ शकेल. विद्यालयाचा एक्सप्रेस फिडर कनेक्शन विद्यालयापासून दूर असल्यामुळे ते तातडीने दुरुस्त करून पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांदळे, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
सोलार वॉटर हिटर, खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण, कबड्डी मॅट, बास्केटबॉल कोर्ट, ओपन जीम, योगा मॅट व सिन्थेटिक रनिंग ट्रॅकची निर्मिती या बाबीना मान्यता दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन कॉम्प्यूटर, फॅन व टेबल्स जिल्हास्तरीय बजेटमधून घेण्यात यावेत याबाबत सूचना केल्या.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन साफसफाई, आरोग्य, निवास व इतर सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना नवोदय विद्यालयाच्या प्राचार्याना दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांनी मांडलेल्या अडचणींचे त्वरित निराकरण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis