एनईपीतून घडेल सामाजिक समस्या सोडविणारा पदवीधर - कुलगुरू डॉ. बोकारे
मंथन फॉर अकॅडेमिया अंतर्गत नागपुरात मंथन बैठक नागपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अधिक लवचिक ठरून सामाजिक समस्या सोडविणारे पदवीधर घडवेल, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ ग
नागपुरात  मंथन फॉर अकॅडेमिया अंतर्गत  मंथन बैठकीत अहवाल पुस्तिकेचे विमोचन  करताना मान्यवर


मंथन फॉर अकॅडेमिया अंतर्गत नागपुरात मंथन बैठक

नागपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अधिक लवचिक ठरून सामाजिक समस्या सोडविणारे पदवीधर घडवेल, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. मंथन फॉर अकॅडेमिया अंतर्गत आयोजित मंथन बैठक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ए. के. डोरले सभागृहात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बोकारे मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत बोकारे, सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरज अय्यर, मंथन फॉर अकॅडेमियाचे समन्वयक श्री. विष्णू चांगदे, तसेच विभागप्रमुख डॉ. राजेंद्र काकडे उपस्थित होते.यावेळी डॉ. बोकारे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी झाली असली तरी NEP-2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासास अधिक महत्त्व देत बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढत असलेल्या युगात विद्यार्थी आधीच गुगल आणि यूट्यूबवर माहिती मिळवत असल्याने त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.उच्च शिक्षणातील घसरती टक्केवारी चिंताजनक असून विद्यार्थ्यांच्या गरजा, समाजातील बदलते संदर्भ आणि रोजगारयोग्यता या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

समाजातील प्रत्येक समस्या विद्यापीठाची

“समाजातील जी समस्या कोणाची नसते ती विद्यापीठाची असते,” असे प्रतिपादन करताना त्यांनी बहुविद्याशाखीय शिक्षणामुळे समस्या सोडविणे अधिक सुलभ होईल, असे स्पष्ट केले.तसेच बीए + आयटीआय-पॉली, बीएस्सी + आयटीआय-पॉली अशा मिश्र अभ्यासक्रमांची संकल्पना पुढे येत असून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी यांसह अर्थार्जनाची संधी उपलब्ध होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारत तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना चीन आणि अमेरिकेतील गॅप कमी करणे हे मोठे आव्हान असून कौशल्याधारित शिक्षणातूनच विकसित भारत घडू शकतो, असे ते म्हणाले.

जगात टिकण्यासाठी कौशल्य गरजेचे

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे म्हणाले की, जगात टिकून राहायचे असेल तर प्रत्येक पिढीने कौशल्य प्राप्त करणे अनिवार्य आहे.

शिक्षक समाजात विवेकबुद्धी निर्माण करणारी पिढी घडवतात. त्यामुळे NEP-2020 प्रभावीपणे राबवून कौशल्ययुक्त तरुण तयार करणे ही वेळेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.अभ्यासक्रम रचताना स्थानिक उद्योजकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.या वेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कॅप्टन सुजित चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी मानले.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande