
नांदेड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांविरोधात महायुतीत व विरोधकांकडूनही मोठ्या प्रमाणात शाब्दिक हल्ले होत आहेत त्यांच्यावर टीका केली जात आहे.यामुळे या निवडणुकीत महायुती जिल्ह्यात होणार का नाही याबद्दल सांक्षकता निर्माण झाली आहे
विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व जागांवर झेंडा फडकवल्यानंतर भाजपाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हातात एकवटले. परंतु निकालानंतरच्या काही दिवसांतच महायुतीतील मित्रपक्ष — शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने चव्हाणांना लक्ष्य करत विखारी आरोपांची मालिका सुरू केली. दुसरीकडे काँग्रेस, उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडूनही चव्हाणांवर पूर्वीपासूनच टीकेचे बाण सोडले जात असल्याने सध्या संपूर्ण राजकीय व्यासपीठावर ‘चव्हाण विरुद्ध सर्व’ असे चित्र निर्माण झाले आहे.
लोकसभा–विधानसभा निवडणुकांमध्ये ‘गळ्यात गळे घालून’ लढलेल्या महायुतीत निकालानंतर मात्र मिठाचा खडा पडल्यासारखे वातावरण झाले.
शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतून चव्हाणांवर सडकून टीका केली.
अजित पवार गटाचे प्रतापराव चिखलीकर, चव्हाणांशी असलेल्या जुन्या वैरातून बाहेर पडले असले तरी, आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा टीकेची कोणतीही संधी न दवडता स्पष्ट शत्रुत्वदाखवले.युतीत असूनही मित्रपक्षांचे हे आक्रमक हल्ले सुरू असताना भाजपाने मात्र राज्यातील महायुतीच्या समीकरणांचा विचार करून संयमाचे धोरण स्वीकारले आणि मवाळ प्रतिउत्तर देत परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis