
सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात 1 हजार 379 दुबार मतदार तर 46 तिबार मतदार असे 1 हजार 425 दुबार, तिबार मतदार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व मतदारांकडून कोणत्या प्रभागातील मतदान केंद्रांवर मतदान करणार याबाबतचे हमी पत्र घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता दि. 31 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर मतदार यादीमध्ये 18 प्रभागातील 2 हजार 827 ठिकाणी 1 हजार 425 दुबार, तिबार मतदार नोंद झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एकापेक्षा जास्त वेळा नाव असलेला मतदार हा प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहे. याची खात्री झाल्यानंतर त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील मतदार केंद्रावर मतदान करणार आहे. याबाबतचे हमीपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड