
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विशेष पुढाकारातून “उमेद पंख विश्वासाचे” या सामाजिक उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फुट वितरणाचा भव्य उपक्रम १८ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत पहिल्यांदाच कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम होत आहे. या संधीचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची अधिक माहिती माहिती देताना.. दिलीप बाबू इंगोले आणि आणि हेमंत काळमेघ यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव (जयपूर फुट) पूर्णपणे मोफत देण्यात येणार असून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे.भारताचे पहिले कृषिमंत्री तसेच श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्व. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे आदर्श लक्षात घेऊन समाजातील दुर्बल घटकांना आत्मनिर्भरतेचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे.हा उपक्रम डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज,अमरावती, इंडियन रेड क्रॉस सोसायटी (अकोला), जयपूर फुट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मणियार (पुणे) आणि दि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.श्री शिवाजी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी परिषदेने या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधून सुमारे ६०० हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांनी या प्रकल्पासाठी नोंदणी केली आहे.
या कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे कार्यालय तसेच विशेष कार्य अधिकारी योगेशजी कोठेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यासोबतच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व अमरावती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या सक्रिय सहभागामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतून संस्था आणि स्वयंसेवी संघटना या प्रकल्पात सहभागी होत आहेत.या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार सौ. रजनी अंबावे यांच्या सुप्रसिद्ध कलाकृतींचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. या कलाकृतींच्या विक्रीतून मिळणारा निधी जयपूर फुट वितरण उपक्रमासाठी वापरला जाणार आहे. तसेच, रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ. किशोर मालोकार यांच्या मार्गदर्शनाखाली रेड क्रॉसचे सदस्यही या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी “उमेद पंख विश्वासाचे” ठरावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.अधिक माहिती साठी अक्षय पाथ्रीकर (माऊली) मोबाईल नंबर.8888907242, प्रकाश गवळी 9881743407 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला..पत्रकार परिषदेला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ,अधिष्ठाता डॉ ए.टी.देशमुख, डॉ.सुरेश आसोले, प्राचार्य डॉ. किशोर मालोकार, रामेश्वर मणियार,संदीप पुंडकर, रजनी अंबादे , आकाश अंबादे, प्रभुजितसिंह बछेर,यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी