
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निवडणूक चिन्हांच्या यादीत यंदा मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या १९४ निवडणूक चिन्हांच्या यादीतून यंदा केळी, गाजर, टरबूज आणि नारळ ही लोकप्रिय चिन्हे वगळण्यात आली आहेत. त्यांच्या जागी भेंडी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि फुलकोबी ही नवीन चिन्हे समाविष्ट करण्यात आली आहेत.
निवडणूक म्हणजे चिन्हांची लढत असे म्हटले जाते. विशेषतः अपक्ष उमेदवारांसाठी प्रचारात चिन्हाची ओळख ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन असते. ग्रामीण जीवन, कृषी उत्पादन आणि दैनंदिन वापरातील वस्तूंशी संबंधित चिन्हांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच यंदा घोषित झालेल्या यादीत भाजीपाल्यासह शेतमालाशी जोडलेली अनेक चिन्हे प्रमुखता मिळवताना दिसत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना संभाव्य चिन्हांची प्राधान्यक्रमाने मागणी करणे अपेक्षित आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांना क्रमवारीनुसार चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.भाजीपाल्याबरोबरच फळांचीही चिन्हे मतदारांच्या पसंतीस उतरू शकतात. भेंडी, मिरची, फुलकोबी ही चिन्हे यावर्षीच्या राजकीय आखाड्यात नवा रंग भरतील. केवळ फुले किंवा पारंपरिक चिन्हेच नव्हे, तर भाज्या, शेंगा, फळे, धान्य, घरगुती वस्तू अशा अनेक प्रकारची नवीन चिन्हे मतदारांच्या समोर येण्याची शक्यता आहे.
उमेदवारांची संख्या वाढल्यास चिन्हांची विविधता देखील वाढेल. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना पोस्टर, बॅनर आणि प्रचार यात्रांमध्ये भाजीपाला-फळांच्या नावांनी प्रचार करणारे उमेदवार पाहायला मिळतील. बदललेल्या चिन्हांमुळे मतदारांचे लक्ष वेधणे ही उमेदवारांसमोरची मोठी रणनीतिक लढत ठरणार आहे.यंदाची चिन्हांची यादी जाहीर झाल्याने निवडणूक वातावरणात नवीन उत्सुकता निर्माण झाली असून अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हांची निवड ही निवडणूक प्रचारातील पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी