
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)धामणगाव रेल्वे नगरपरिषद राजकारणात अडसड कुटुंबाचे एक विशेष आणि दुर्मिळ उदाहरण आजही चर्चेत आहे. सत्ता मिळाल्यानंतर खुर्ची सोडणे हे सर्वांसाठी कठीण मानले जाते. पण जनसंघाचे पहिले नगराध्यक्ष दादाराव अडसड आणि भाजपकडून पहिल्यांदा नगराध्यक्ष झालेल्या अरुण अडसड या पिता-पुत्रांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच नगराध्यक्ष पदाचा स्वेच्छेने त्याग केला होता. धामणगाव नगरपरिषदेच्या इतिहासात हे एक आदर्श आणि उल्लेखनीय पान मानले जाते.
धामणगाव नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष काँग्रेसचे बालकिसन मुंधडा होते. त्यानंतर नगराध्यक्षपद काँग्रेस, जनसंघ, काँग्रेस आणि भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांकडे गेले. या नगरपरिषदेला दीर्घ राजकीय इतिहास लाभलेला असून अनेक महत्त्वाच्या नोंदी इथे जतन आहेत. काँग्रेसचे सुगणचंद लुणावत नगराध्यक्ष झाल्यानंतर थेट आमदार म्हणून निवडून आले, तर शुभकरण सराफ यांनी सलग सात वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
सन १९६० मध्ये जनसंघाच्या ताब्यात धामणगाव नगरपरिषद आली तेव्हा दादाराव अडसड थेट नगरसेवकांतून निवडून आलेले नगराध्यक्ष बनले. त्या काळी नगराध्यक्षांचा कार्यकाळ सात वर्षांचा होता. पण दादाराव अडसड यांनी साडेतीन वर्षांनंतरच स्वेच्छेने राजीनामा देत पुढील साडेतीन वर्षांचे पद गणपतदादा पोळ यांच्याकडे सोपवले.१९८० मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर अरुण अडसड नगराध्यक्ष झाले. त्यांनीही अडीच वर्षाचे कामकाज पूर्ण होताच पद त्याग करून उर्वरित कालावधी सत्यनारायण मुंधडा यांच्याकडे सोपवला.
मागील निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने प्रतिभा अडसड यांना संधी उपलब्ध होती. वडील, मुलगा आणि सून—तीघांनाही नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी असताना अडसड कुटुंबाने पदाचा आग्रह न धरता उर्मिला बोरुंदिया यांना नगराध्यक्ष बनविण्यास प्राधान्य दिले.धामणगाव नगरपरिषदेत अडसड कुटुंबाने सत्ता असूनही पदाचा त्याग करून दाखवलेले उदाहरण आजच्या राजकारणात विलक्षण व आदर्शवत ठरते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी