अमरावती - ध्वनिक्षेपकावर प्रचाराला वेळेची मर्यादा; सकाळी ६ पूर्वी व रात्री १० नंतर बंदी
अमरावती, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचारासाठी ध्वनिक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे ध्वनीप्रदूषण वाढणे, नागरीकांच्या शांततेला बाधा पोहोचणे आणि विशेषतः वृ
ध्वनिक्षेपकावर प्रचाराला वेळेची मर्यादा : सकाळी ६ पूर्वी व रात्री १० नंतर बंदी; प्रशासनाची करडी नजर


अमरावती, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचारासाठी ध्वनिक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे ध्वनीप्रदूषण वाढणे, नागरीकांच्या शांततेला बाधा पोहोचणे आणि विशेषतः वृद्ध, रुग्ण, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वातावरणात व्यत्यय निर्माण होणे असे तोटे होत असल्याने प्रशासनाने ध्वनिक्षेपक वापरावर कठोर नियम लागू केले आहेत. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपकावरून प्रचार करण्यास कडक बंदी राहणार आहे.

निवडणूक काळात उमेदवार, कार्यकर्ते व प्रचार वाहनांद्वारे होणाऱ्या ध्वनिक्षेपणामुळे ध्वनीप्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ठराविक वेळेचे बंधन काटेकोरपणे लागू करण्यात आले आहे. प्रचार वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे मोठ्या आवाजात फेरफटका मारत फिरणे देखील बंदीच्या परिघात आहे.

ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असेल. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा कोणताही वापर कायद्याच्या कक्षेत येणार असून त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. परवानगी मिळाल्यानंतरही काही अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. दिवसा प्रचार करणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर फिरत्या वाहनावर करत फिरण्याऐवजी, विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ध्वनिक्षेपकाचा आवाज सतत चालू ठेवत जागोजागी फिरणाऱ्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला देणे आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.

पोलीस विभागानेही या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. ध्वनीप्रदूषणाविषयी नागरिकांकडून तक्रारी आल्यास त्वरित कारवाई केली जाईल, असा प्रशासनाचा इशारा आहे. प्रत्येक व्यक्तीवर व्यक्तिगत दंडात्मक कारवाई करणे शक्य नसले तरी, पोलिस विभागाकडून या आदेशांची सार्वजनिक घोषणा करून जागरूकता वाढविणे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे अपेक्षित आहे.प्रचाराच्या उत्साहात आवाजाची मर्यादा राखणे आवश्यक असून, सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी हे नियम पालन करून शांततेचे व आरोग्यदायी वातावरण टिकवावे, अशी प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande