
रायगड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
कार्तिक एकादशी (उत्पत्ती एकादशी) निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वरसोली येथे विठ्ठल यात्रेला आजपासून शुभारंभ झाला. १५ ते २० नोव्हेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत ही यात्रा भाविकांसाठी खुली राहणार आहे. पहाटे २.३० वाजता काकड आरतीने यात्रेची मंगल सुरूवात झाली. त्यानंतर ३.०० वाजता महाअभिषेक आरती संपन्न झाली. सकाळी ४.३० वाजल्यापासून देवदर्शनास प्रारंभ होत असून भाविकांची गर्दी वाढत चालली आहे.
यावर्षी उशिरा पर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या पाळण्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र लहान मुलांसाठी लहान पाळणे, खेळणी आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात्रेच्या वातावरणात आनंदाचा रंग भरत असून सर्व वयोगटातील भक्त याचा आनंद घेत आहेत.
विठ्ठल देवस्थान समितीने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला असून स्थानिक पोलीस यंत्रणादेखील सहकार्य करत आहे. देवस्थान परिसरात कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा लावण्यात आली आहे, ज्यामुळे भाविकांना कार्यक्रमांची माहिती सहज मिळत आहे.
यंदाची यात्रा सहा दिवसांची असल्याने भाविकांना आपल्या सोयीप्रमाणे देवदर्शन व यात्रेचा आनंद घेण्याची पूर्ण मुभा आहे. मात्र पार्किंगची जबाबदारी यात्रेकरूंनाच स्वतःच्या जोखिमेवर सांभाळावी लागणार आहे. काही ठिकाणी खाजगी पेड पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या पार्श्वभूमीवर वरसोली विठ्ठल यात्रा उत्साहात सुरू झाली असून पुढील सहा दिवस परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके