
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्याने सन 2025 मध्ये जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवत 'शून्य उद्रेक' चा महत्त्वाकांक्षी उद्देश यशस्वीपणे साध्य केला आहे. सन 2020 मध्ये याच जिल्ह्यात, विशेषतः मेळघाट क्षेत्रात, 521 रुग्ण बाधित आणि काही मृत्यूंसह जलजन्य आजारांचा मोठा उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आगामी काळात अशा आपत्ती टाळण्यासाठी. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयित आरोग्य कृती आराखडा तयार केला.या आराखड्यानुसार, 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत जिल्ह्यातील 836 ग्रामपंचायतींमध्ये पाणी गुणवत्ता व स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली, ज्यात 600 हून अधिक ग्रामपंचायतींना 'हिरवे कार्ड' देण्यात आले. जिल्हा स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करून प्रत्येक तालुक्याच्या साथरोग स्थितीचा मागोवा 24 तास दूरध्वनीद्वारे घेण्यात आला. तसेच, जिल्हा व तालुका स्तरावर त्वरित प्रतिसाद पथके आणि 7 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यांना दोन-दोन तालुक्यांच्या देखरेखीची जबाबदारी दिली गेली. मेळघाटासाठी 'एक दिवस मेळघाटकरिता' उपक्रम राबवून स्थानिक समस्या त्वरित निवारण करण्याचे आदेश देण्यात आले. पूर आणि अतिवृष्टीमुळे संपर्क तुटणाऱ्या 16 गावांमध्ये एक महिना पुरेल इतका औषधांचा साठा ठेवण्यात आला. त्याचबरोबर, या भागातील गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून 24 तास पर्यायी आरोग्य सेवा पुरविण्यात आली. 'स्टॉप डायरिया कॅम्पेन’ आणि व्यापक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षित पाणी पिणे आणि स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यात यश आले. या सर्व समन्वित प्रयत्नांमुळे 2025 मध्ये जिल्ह्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा एकही उद्रेक झाला नाही, ज्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थापनाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी