
चंद्रपूर, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। 36 कोटी 73 लक्ष रुपये खर्च करून बल्लारपूर येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) नुतन इमारत बांधण्यात येणार असून ही इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी साकारण्यात येणार आहे.
बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) नुतन इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन आणि कोनशिला समारंभात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर प्रमुख अतिथी म्हणून होते. यावेळी मंचावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल पानसरे, न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दि भिष्म, बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ ईनायत सय्यद, बल्लारपूरच्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) सोनिया सावळेश्वरकर उपस्थित होते.
36 कोटी 73 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणारी ही इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी साकारण्यात येणार आहे. तळमजल्यावर साक्षदार केंद्र, समुपदेशन कक्ष, लोक अदालत कक्ष, चौकीदार कक्ष. पहिल्या माळ्यावर 2 कोर्ट हॉल, 2 न्यायाधीश कक्ष, प्रशासकीय कामाकरीता कार्यालयीन कक्ष. दुस-या माळ्यावर दोन कोर्ट हॉल, दोन न्यायाधीश कक्ष, दोन अधिवक्ता कक्ष, ग्रंथालय, मध्यस्थी कक्ष, सहायक सरकारी अभियोक्ता कक्ष आणि तिस-या माळ्यावर व्ही.सी. रूम, सभा कक्ष, न्यायाधीश ग्रंथालय, अभिलेखागार कक्ष राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव