सेलूत अवतरली साहित्यपंढरी : ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरातून निघालेल्या ग्रंथ दिंडीतील सहभागी शालेय विद्यार्थ्यांच्या पथकाने सादर केलेल्या हरिनामाच्या गजरासह ,टाळ म
सेलूत अवतरली साहित्यपंढरी :ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद: पहिले अक्षर साहित्य संमेलन


परभणी, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरातून निघालेल्या ग्रंथ दिंडीतील सहभागी शालेय विद्यार्थ्यांच्या पथकाने सादर केलेल्या हरिनामाच्या गजरासह ,टाळ मृदंग व लेझीमच्या निनादामुळे सेलूत साहित्य पंढरी अवतरल्याची अनुभूती आली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला सेलूकरांनी व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला .

ग्रंथ दिंडीच्या मार्गावर शहरातील महिला भगिनी व संयोजकांच्या वतीने कलाशिक्षक यांच्या पुढाकारातून सडा व रांगोळीने रस्ते सुशोभित करण्यात आले होते. शहरातील मान्यवरांच्या वतीने ग्रंथ दिंडीच्या मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वंदे मातरमला १५०वर्ष पूर्ण झाल्यामुळे नूतन विद्यालयाच्या वतीने भारतमाता तसेच केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ प्रतिकात्मक सजीव देखावा ग्रंथ दिंडीच्या दर्शनी भागात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. के.बा. विद्यालय व नूतन कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व न्यू हायस्कुलच्या चिमुकल्या नऊ वारी साडीतील विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग नोंदविला. तसेच डासाळा येथील जिल्हापरिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदवून टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत ग्रंथदिंडीची शोभा वाढवली.तसेच नऊ वारी साडीतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी फुगडी खेळून ग्रंथदिंडीत भक्तिमय वातावरण निर्माण केले.

ग्रंथ दिंडीत सहभागी प्रत्येकांच्या डोक्यावरील साहित्य संमेलनाचा नामोल्लेख असणारी टोपी लक्षवेधक ठरली.दिंडी मार्गावरील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा भारतमाता व भक्त पुंडलिकाचा देखावा,न्यू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला वारकरी दिंडी देखावा तसेच कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला संत जनाबाई ,बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविलेला देखावा आणि विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला वारकरी संतमेळा देखावा दिंडीतील सहभागी साहित्यिकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.एव्हढेच नव्हें तर दिंडीत सहभागी असणाऱ्या सर्वांना पालखी व देखाव्यांसमवेत छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही.दिंडीतील पालखीत भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी ग्रंथ व श्री.केशवराज बाबासाहेब महाराज यांचा चरित्रग्रंथ ठेवण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मार्गस्थ झालेल्या ग्रंथ दिंडीतील मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. ग्रंथ दिंडीचा समारोप कै. श्रीरामजी भांगडीया नगरीतील साई नाट्यगृह परिसरात करण्यात आला. व त्यानंतर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभ करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande