
अकोला, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्ली येथील बॉम्बस्फोटानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी देशव्यापी तपासाला सुरुवात केली आहे. या तपासाचा एक भाग म्हणून अकोला पोलिसांनी एका युवकाची आठ तास कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत स्फोट घडला, त्यावेळी अकोल्यातील हा इसम आसपासच्या परिसरात होता. तपासात ही बाब पुढे आल्यानं अकोला पोलिसांना याबाबत कळविण्यात आले होते.
माहिती मिळाल्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीनं पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एक खास पथक तयार केले. संशयित इसमाला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं. अकोला जिल्हा धार्मिकदृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळं या प्रकरणाचा कुठेही गवगवा होणार नाही, याची पूर्ण खबरदारी अकोला पोलिसांनी घेतली. विशेष म्हणजे संशयित इसमाला ताब्यात घेताना केवळ तो एका विशिष्ट धर्माचा आहे, म्हणून गुन्हेगार ठरतो अशी वागणूक अकोला पोलिसांनी त्याला दिली नाही. चौकशी नंतर त्याला सोडून देण्यात आले..
संशयित युवकाला ताब्यात घेताना अकोला पोलिसांनी पूर्ण काळजी बाळगली. युवकाच्या परिवाराला किंवा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात आली. इतकेच काय तर युवकाला ताब्यात घेतल्यानंतर आसपासच्या परिसरात त्याच्या परिवाराची विनाकारण बदनामी होणार नाही, हे देखील पोलिसांनी केले. युवकाला घेऊन अकोला पोलिसांच्या पथकाने एसपी ऑफिस गाठले. येथे स्वत: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी युवकाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. अकोल्यातील हा युवक स्फोट झाला, त्यावेळी दिल्लीत काय करत होता हे जाणून घेण्यात आल्याची आहे.
चांडक यांनी प्रत्येक बाजूने खातरजमा करून घेतली. युवकाने सांगितलेला घटनाक्रम आणि माहिती सर्वंच ‘अँगल’ने तपासली. केंद्र सरकारने प्रतिबंध लावेपर्यंत अकोल्यात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आणि दिनदार अंजुमन या दोन संघटनांच्या म्होरक्यांचा मुक्तसंचार होता. अकोल्यासह राज्यात अनेक ठिकाणी घडलेल्या जातीय दंगलीमागे या दोन्ही संघटनांचा सहभाग आढळला होता. दिनदार अंजुमन या संघटनेचा काही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातही सहभाग होता. त्यामुळं केंद्र सरकारनं 2000 मध्ये या संघटनेवर प्रतिबंध लावले.
कोणत्याही देशविघातक कृत्याचा सुरक्षा यंत्रणा कसून तपास करतात. दिल्ली येथे घडलेल्या बॉम्बस्फोटामुळे देशाला हादरा बसला. त्यामुळे काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत तपास यंत्रणा या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांचा शोध घेत आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या सीमेपलीकडे जात यात कोणाचा सहभाग होता का, ही बाजूही तपासून पाहिली जात आहे. या युवकाच्या अनुषंगाने पिंजर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार झाली होती.
हा तोच 18 वर्षीय युवक होता, जो दिल्लीत स्फोटाच्या वेळी दिसला होता. स्फोटाच्या घटनेनंतर हा युवक पुन्हा अकोला जिल्ह्यात परतला. त्यामुळे यंत्रणांनी पोलिसांना सर्व बाजूने तपास करण्यासाठी सतर्क केले होते. मात्र या युवकाचा आणि दिल्लीतील स्फोटाच्या घटनेचा संबंध नसल्याचे चौकशी आढळले. त्यामुळं पोलिसांनी त्याची मुक्तता केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे