
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
दूध, अंडी असो, की भाजीपाला अश्या कोणत्याही कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ करणारी दुचाकी, घर, गोठा किंवा कांदाचाळीचे तापमान कमी करणारा पत्रा, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, वीज नसेल तरी त्याची उणीव भरून काढणारा सोलर पॅनल अशी एक ना अनेक कृषीपूरक साधने पाहून शेतकऱ्यांसह शहरवासीय थक्क होत आहेत. निमित्त आहे अग्रगण्य कृषी प्रदर्शन 'कृषीथॉन २०२५'चे. हे पाहण्यासाठी रविवारी (दि.१६) अलोट गर्दी दिवसभर उसळली होती.
हे प्रदर्शन १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम, ए.बी.बी. सर्कलजवळ भरलेले आहे. यात देशासह परदेशातील ३००हून अधिक कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत. यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे कंपन्या, कृषी अवजारे उत्पादक, ट्रॅक्टर व सिंचन कंपन्या, फवारणी यंत्रे उत्पादक, बँका, विमा कंपन्या, कृषी संशोधन केंद्रे, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी हे मोठ्या संख्येने भेट देत प्रदर्शनाची माहिती घेत आहे. विविध सुविधायुक्त ट्रॅक्टरची शेतकरी बारकाईने माहिती घेत आहे. यात ट्रॅक्टर वळत असताना कीटकनाशक वाया न जाण्यासाठी स्प्रे लगेच बंद करण्याचे बटण, शेतात ट्रॅक्टरचे मागचेच, नाही तर आता पुढचेही चाक स्वशक्तीने पुढे जाते याचीही ते नोंद घेत होते. नर्सरीतील रोपे व पॉटसह आहेत. विविध प्रकारच्या मसाल्यांसह शबरीची आदिवासी भागातील नागलीची उत्पादने, मधासह इतरांचे विविध फ्रूट जॅम्स, बिस्कीट्स असे अनेक पदार्थ घेण्यासाठी झुंबड उडत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV