
नांदेड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महायुती मधील घटक पक्षाने वेगळी चूल मांडल्यानंतर आता भाजपानेही स्वबळाचा नारा दिला आहे. भोकर, मुदखेड आणि कंधार नगर पालिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. महायुती मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायत पैकी चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचे उमेदवार जवळपास निश्चित केले आहे. मात्र अधिकृत घोषणा बाकी आहे.
घटक पक्षातील शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. परंतु मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाबाबत मात्र त्यांनी कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.
माहितीनुसार भोकर नगरपालिकेसाठी माजी नगराध्यक्ष संगीता चिंचाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर मुदखेड मध्ये माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कंधार मधून भाजपाचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यंन्नावार यांनी अध्यक्षपदाचा अर्ज दाखलही केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महायुती मधील त्यांनी स्थानिक पातळीवर सर्वाधिकार दिले आहेत. त्यामुळे युतीतील तिन्ही पक्ष आपापल्या शक्तीने निवडणूक आखाड्यात उतरतील यात शंका नाही.
------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis