नांदगावमध्ये राष्ट्रवादीला वगळून शिंदे सेना भाजपाची युती
नांदगाव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। : राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या महायुतीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध ठिकाणी बेबनाव निर्माण झाला आहे. नगर पंचायत
नांदगावमध्ये राष्ट्रवादीला वगळून शिंदे सेना भाजपाची युती


नांदगाव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

: राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या महायुतीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध ठिकाणी बेबनाव निर्माण झाला आहे. नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये या तीन पक्षांपैकी दोन पक्ष एका बाजूला आणि एक पक्ष विरोधात उभा ठाकल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.

नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत अशीच स्थिती आहे. या ठिकाणी भाजपने शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत एकाकी पडली आहे. भाजप व शिंदे गटाची ही युती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी निवडणुकीपूर्वीचा धक्का असल्याचे मानले जात आहे.

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे व मंत्री छगन भुजबळ यांच्यात कट्टर राजकीय हाडवैर आहे. उभयतांचे पक्ष राज्यातील महायुतीचे घटक पक्ष असले तरी स्थानिक पातळीवर हे दोघेही नेते परस्परांना प्रमुख विरोधक मानतात. या पार्श्वभूमीवर नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता सुरुवातीपासून धुसर दिसत होती. त्यामुळे महायुतीऐवजी या ठिकाणी केवळ भाजपबरोबर युती करावी, यासाठी शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून प्रथमपासून प्रयत्न सुरू होते. त्याचाच भाग म्हणून आमदार कांदे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांना गळ घातली. महाजन यांनी मात्र दोघांमध्ये समेट घडवून महायुती करण्याचा प्रयत्न केला होता.

एकीकडे भाजपकडून महायुती करण्याचा प्रयत्न सुरू असताना समीर भुजबळ यांनी मात्र शिंदे गटाबरोबर निवडणूक न लढविण्याची भूमिका जाहीरपणे मांडली.

त्यामुळे कांदे यांचे पित्त खवळले. त्यांनी भुजबळ यांना खुले आव्हानच देऊन टाकले. समीर भुजबळ यांनी शिंदे गटाला दिलेले आव्हान स्वीकारत आहोत आणि दम असेल तर त्यांनी स्वतः निवडणुकीत उभे राहावे. मी समीरला पाडून दाखवेल, अशी भाषा कांदे यांनी वापरली. या दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती होऊन शिंदे गटाला झटका देण्याची राजकीय खेळी खेळली जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

तथापि नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट व भाजप या दोन पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय आता जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन मित्र पक्षांच्या युतीबरोबर दोन हात करण्याची वेळ आली आहे. सुहास कांदे, भाजपचे नांदगाव तालुकाध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी शनिवारी रात्री उशिरा संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. नांदगाव नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे तसेच या युतीमुळे नांदगाव शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande