
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)
नगरपरिषदेची निवडणूक भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची युती करून लढवली जाणार असल्याची घोषणा माजी खासदार हेमंत वाजे यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपचा राहणार असून, अन्य जागा वाटपाबाबत स्थानिक पदाधिकारी समन्वय साधून निर्णय घेणार आहेत. भाजप व शिवसेना पक्षाच्या चिन्हावर या निवडणुकीत उमेदवार मैदानात उतरणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिंदे सेना यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. अखेर भाजप-शिंदेसेना यांनी सिन्नर नगरपरिषद निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा भाजपचे नेते उदय सांगळे यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसांत सर्वेच्या माध्यमातून जागा व उमेदवारी वाटप केले जाणार आहे. सिन्नर नगरपरिषदेवर भाजप-शिंदे सेनेचे सत्ता येईल असा विश्वास गोडसे, बच्छाव व सांगळे यांनी यावेळी व्यक्त केला. थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून चार ते पाच नावांची चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष हेमंतवाजे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केल्यानंतर याबाबत चर्चा सुरू असल्याचे बच्छाव म्हणाले.
राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी सिन्नर नगरपरिषदेत भाजप व शिंदेसेना यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि सेना-भाजप युती यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत यावेळी मिळाले. यापूर्वीच महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भाजप-शिंदेसेना युती झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणुक भाजप-शिंदेसेना, महाविकास आघाडी आणि अजित पवार राष्ट्रवादी अशी तिरंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV