रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तीन तरुण बुडाले; एक बेपत्ता
रत्नागिरी, 16 नोव्हेंबर, (हिं. स.) : श्री क्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) समुद्रात शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण बुडाले. त्यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा तरुण बेपत्ता आहे, तर विकास विजय पालशर्
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तीन तरुण बुडाले; एक बेपत्ता


रत्नागिरी, 16 नोव्हेंबर, (हिं. स.) : श्री क्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) समुद्रात शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण बुडाले. त्यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा तरुण बेपत्ता आहे, तर विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांना समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले.

शनिवार, रविवार सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांचा ओघ गणपतीपुळे समुद्रात वाढला आहे. मात्र समुद्रस्नानाचा आनंद जीवावर बेतत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी तिघेजण समुद्रात आंघोळीला गेले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले. त्यांच्या सोबत किनाऱ्यावर असलेल्या मित्रांनी तातडीने आरडाओरडा करून मदत मागितली.

यावेळी मोरया वॉटर स्पोर्टच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तात्काळ धाव घेत दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. दोघांवर उपचार करून त्यांना सुरक्षित स्थितीत आणण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून गणपतीपुळे किनाऱ्यावर बुडण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. पर्यटकांना वारंवार खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना देण्यात येत असल्या तरी काही पर्यटकांकडून अतिउत्साह आणि बेजबाबदार वर्तन केले जात असल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड-गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande