प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी : राज्यपाल
मुंबई, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। एक एक एकर शेतजमिनीवर १३ - १३ बॅग युरिया टाकला जात आहे. जमीन पंढऱीफट्ट होत आहे. त्यामुळे फळे, भाज्या, अन्नधान्य विषयुक्त होत आहेत. देशातील लाखो एकर शेत जमीन ओसाड झाली असून कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तचाप अनेक पटींनी वाढ
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी: राज्यपाल आचार्य देवव्रत


मुंबई, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। एक एक एकर शेतजमिनीवर १३ - १३ बॅग युरिया टाकला जात आहे. जमीन पंढऱीफट्ट होत आहे. त्यामुळे फळे, भाज्या, अन्नधान्य विषयुक्त होत आहेत. देशातील लाखो एकर शेत जमीन ओसाड झाली असून कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तचाप अनेक पटींनी वाढत आहे. आज देशाला नैसर्गिक शेतीशिवाय तरणोपाय नाही. राष्ट्रनिर्माण कार्यात प्रशासकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

'संकल्प फाउंडेशन' या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी 'नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा' या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

देशात अडीच लाख कोटी रुपये खर्च करून युरिया व रासायनिक खाते आयात केली जात आहेत. एकाअर्थी आपणच आपल्या पैशाने आपली शेतजमीन नापीक करीत आहोत. एका कृषी विद्यापीठामधील संशोधनानुसार आज मातेच्या दुधात देखील डिटर्जंट, कीटकनाशक, युरिया आदी रसायने आढळून आली आहेत. गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे असे सांगून रासायनिक तसेच जैविक शेती पेक्षा नैसर्गिक शेती मानव तसेच सूक्ष्म जीव कल्याणाची आहे असे राज्यपालांनी सांगितले.

धर्म, अर्थ व काम यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीसाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे व आरोग्यासाठी दिनचर्या, भोजन यांसह पर्यावरण महत्वाचे आहे असे राज्यपालांनी सांगितले. आज जागतिक तापमानवाढ जगापुढे मोठे संकट आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर पडत आहे. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी व नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा यांनी आपल्या प्रास्ताविकात संकल्प फाउंडेशनने आजवर हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले असून ते भारतीय सांस्कृतिक विचार पुढे नेत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्पचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande