
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्तींचे जवळपास दहा हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेकरिता विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून तातडीने करावी. महाविद्यालय स्तरावरील अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा आदेश विद्यापीठाने दिला.
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेकरिता विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर विविध तांत्रिक अडचणी काढून प्रलंबित ठेवले आहेत. डीबीटीच्या डॅशबोर्ड अहवालानुसार ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पुणे विभागांतर्गत महाविद्यालये, विद्यापीठ आणि संस्था स्तरावर दहा हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु