
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)रब्बी हंगाम सुरू होण्याच्या सुरुवातीलाच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे वेळापत्रक बदलवल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत असतांना निंभी राजुरवाडी पिंपळखुटा मोठा परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा तसेच या भागातील ट्रांसफार्मर त्वरित बदली करून रात्रीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असून कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या शेतातील रात्रीला सिंगल फेज लाईन सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस हितेश साबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यकारी अभियंता मोर्शी यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले होते.
अखेर महावितरण कंपनीने हितेश साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सर्व कृषी पंप वीज ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देण्याच्या हदृष्टीकोनातून ३३ केव्ही उपकेंद्रावरील पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ करण्याचे काम ४५ दिवसामध्ये पूर्ण करून सर्व कृषी वाहिन्यांवरील कृषिपंप वीज ग्राहकांना दिवसाने वीजपुरवठा करण्यात येईल. निंभी पिंपळखुटा राजूरवाडी भागातील सर्व ट्रान्सफॉर्मर बदलविण्यात आलेले असून हितेश साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू असल्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून महावितरण कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर विभागीय कार्यालय, मोर्शी येथे १७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेले ठिय्या आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले असल्याचे हितेश साबळे यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी