
मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.) - पालघर जिल्ह्यातील काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली असल्याची माहिती प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. पालघर जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.
श्री. बन यांनी सांगितले की, श्री. काशिनाथ चौधरी यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणी साक्षीसाठी बोलावले होते. चौधरी यांचा सीबीआय अथवा सीआयडी यांनी केलेल्या तपासात कोठेही आरोपी म्हणून उल्लेख नाही. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रामध्ये चौधरी यांचे नाव नाही. या सर्व माहितीची खातरजमा करून स्थानिक पातळीवर श्री. चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालघर साधू हत्याकांडातील दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीने आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. पुरेशी चौकशी करून स्थानिक पातळीवर चौधरी यांच्या प्रवेशाचा निर्णय झाला. मात्र या प्रवेशानंतर समाज माध्यमांमध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्याने या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. बन यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांना स्मृतीभ्रंश झाला असावा
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी राजकीय फायद्या - तोट्याची पर्वा केली नाही. त्यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्यांचा मताचा अधिकार काढून घेण्यात आला होता, याचा राज ठाकरेंना विसर पडला आहे. राज ठाकरेंची स्मरण शक्ती चांगली आहे, पण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत त्यांना स्मृतीभ्रंश झाला असावा अशी शंका येते, असेही श्री. बन म्हणाले.
कालपर्यंत चांगले असलेले चौधरी रोहित पवारांसाठी आज दोषी झाले
काशीनाथ चौधरी हे कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. राष्ट्रवादीमध्ये असताना रोहित पवार यांना चौधरी हे चांगले वाटत होते. त्यावेळी पालघर हत्याकांड प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींना शिक्षा व्हावी असे रोहित पवारांना वाटले नाही. मात्र शरद पवार गटाची राष्ट्रवादी सोडल्यावर रोहित पवार यांना एका रात्रीत काशीनाथ चौधरी दोषी कसे वाटू लागले? रोहित पवारांचा हा दुटप्पीपणा जनता सहन करणार नाही, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी