
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)जिल्हा परिषद निवडणुकीत 'आडसकर फॅक्टर' प्रभावी होईल का याची चाचणी सध्या सुरू आहे. केज, अंबाजोगाई, धारूर तालुक्यात राजकीय प्रभाव असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत केज, अंबाजोगाई आणि धारूर या तीन तालुक्यांच्या राजकारणावर रमेश आडसकर यांचा 'फॅक्टर' अत्यंत निर्णायक ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राजकीय प्रवासात झालेल्या मागील चूका टाळत आडसकर यांनी आता अधिक संयमाने आणि व्यापक जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केले आहे.
शेतकऱ्यांसाठी संजीवनी रमेश आडसकर यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान आहे.
शेतकऱ्यांना वेळेत आणि चांगला दर देण्याची आडसकर यांची ग्वाही परिसरातील कृषी अर्थकारणावर थेट परिणाम करत आहे.
अंबाजोगाई साखर कारखाना यशस्वीपणे चालवल्यास मिळणारी शेतकऱ्यांची साथ, मागील १० वर्षांच्या सत्तेबाहेर राहण्याने मिळालेली जनतेची सहानुभूती आणि केज, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यांमध्ये असलेला राजकीय प्रभाव, या सर्व बाबींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आडसकर फॅक्टर प्रमुख भूमिका बजावेल यात शंका नाही. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार असून, आडसकर या राजकीय भांडवलाचे मतांमध्ये कसे रूपांतर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis