मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले
मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात


अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आठवडाभरापुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्याच्या वेळी आल्हाद कलोती यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. कलोती परिवाराची सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अशी दुहेरी ओळख असलेल्या आल्हाद कलोती यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे चिखलदरा येथील निवडणूक रंगतदार बनली आहे.

आमदार रवी राणा यांनी आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा देताना चिखलदऱ्याच्या विकासाचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांच्या आवडीशी जोडला. रवी राणा म्हणाले, चिखलदरा हे देवेंद्र फडणवीस यांचे आवडते आणि आपुलकीचे ‘हिल स्टेशन’ आहे. आल्हाद कलोती निवडून आल्यास येथील विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. कलोती परिवाराने अंध विद्यालय, शैक्षणिक क्षेत्र, तसेच गवळी, आदिवासी, ओबीसी व कलार समाजासाठी केलेल्या भरीव कार्याचा वारसा आल्हाद कलोती पुढे नेत आहेत. ‘स्काय वॉक’, पर्यटन विकास, रस्ते सुविधा, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प आणि विद्युत प्रकल्पांसारखे मोठे प्रकल्प कलोती यांच्यामुळेच मार्गी लागतील. त्यामुळे चिखलदऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तेच योग्य उमेदवार आहेत, त्यांच्या विजयासाठी युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीने काम करेल, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार नवनीत राणा यांनीही आल्हाद कलोती हेच चिखलदऱ्यासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगितले. चिखलदऱ्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.

आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी भाजपचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, प्रविण पोटे, राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगलेकर, अन्वर हुसेन यांच्यासह भाजप व युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande