राजकारणात पैशाशिवाय पर्याय नाही? कार्यकर्त्यांमधून घराणेशाही विरोधी असंतोष
रायगड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सध्याच्या राजकारणात पैशांशिवाय निवडणूक जिंकणे अशक्य आहे, अशी मानसिकता सर्वदूर तयार करण्यात काही राजकीय नेते यशस्वी झाले असल्याची कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे. या वातावरणामुळे सुशिक्षित, प्रामाणिक, होतकरू आणि ल
“राजकारणात पैशाशिवाय पर्याय नाही? कार्यकर्त्यांमधून घराणेशाहीविरोधी असंतोष”


रायगड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सध्याच्या राजकारणात पैशांशिवाय निवडणूक जिंकणे अशक्य आहे, अशी मानसिकता सर्वदूर तयार करण्यात काही राजकीय नेते यशस्वी झाले असल्याची कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे. या वातावरणामुळे सुशिक्षित, प्रामाणिक, होतकरू आणि लढाऊ कार्यकर्ते राजकारणापासून दूर जात आहेत.

त्याचबरोबर घराणेशाहीची मक्तेदारी घट्ट होत असून महत्त्वाची पदे आणि राजकीय लाभ आपल्या घराण्यापुरती मर्यादित ठेवण्याचा कल अधिकच वाढला आहे. कार्मिक तक्रार अशी की, अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करूनही तिकीटाच्या प्रतीक्षेत राहतात, तर नेत्यांची मुले आणि जवळचे नातेवाईक थेट पदांवर पोहोचतात. पैशाचा प्रभाव आणि नेत्यांची आंतरिक मर्जी यामुळे कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य जणू थांबून राहते. नेत्यांकडून महापालिकेसाठी २०–२५ लाख आणि विधानसभेसाठी कोट्यवधी असा जो प्रचार केल्या जातो, तो सामान्य कार्यकर्त्यांना राजकीय स्पर्धेतून बाहेर ढकलतो, असे निरीक्षण अनेकांनी मांडले. काही कार्यकर्त्यांच्या मते, हे नरेटिव्ह मुद्दाम पसरवले जात असून पैशांवर उभी राहिलेली सत्ता अधिक मजबूत करण्याचा हेतू त्यामागे आहे.

अतिवृष्टी, पूर, शेतकऱ्यांचे नुकसान अशा संकटांच्या काळात नेते कोठेच दिसत नाहीत, तर निवडणुकीच्या काळातच केवळ संपर्क वाढतो, अशी टीकाही कार्यकर्त्यांनी केली. पैशाने निवडून आलेले लोक जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर येत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह असा की, आता तरी पक्षांनी सुशिक्षित, प्रामाणिक, होतकरू आणि लढाऊ तरुणांना संधी द्यावी. पैशावर आधारित निवडणूक पद्धती मोडून, समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांना पुढे आणण्याची हीच योग्य वेळ आहे. जनतेनेही पैशाच्या मोहातून बाहेर येत योग्य उमेदवाराला मत दिल्यासच राजकारणातील मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande