
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती महापालिकेच्या प्रभाग निहाय प्रारूप आरक्षणावर आक्षेप वा सूचना नोंदविण्याची प्रक्रियेसाठी 17 ते २४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार २२ प्रभागांतील ८७पैकी अनुसूचित जाती (एससी) साठी १५ जागा, अनुसूचित जमाती (एसटी) साठी २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी २३, तर सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी ४७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच या ८७ पैकी ४४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एससी महिलांसाठी ८, ओबीसी (ना.मा.प्र) महिलांसाठी १२, एसटी महिलेसाठी १, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २३ अशाप्रकारे एकूण ४४ जागा महिलांसाठी आरक्षित आहे; मात्र यापैकी कोणत्याही जागेच्या आरक्षणावर राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, त्यांनी ते आक्षेप वा सूचना २४ नोव्हेंबरपर्यंत राजकमल चौकातील महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील निवडणूक विभागात दाखल करण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी