
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तब्बल 160 नवीन एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ही नवी यंत्रणा याच महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित होणार असून, यामुळे स्थानक परिसराच्या सुरक्षेत आणखी वाढ होणार आहे.दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभुमीवर पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा करण्यासाठी हे कॅमेरे महत्वाची कामगिरी बजावणार आहेत. सध्या रेल्वे स्थानकावर असलेले जुने 75 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते नवीन 160 उच्च दर्जाचे कॅमेरे कार्यान्वित झाल्यावर काढण्यात येणार आहेत. या नव्या प्रणालीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फेस रेकग्निशन (चेहरा ओळखण्याची) क्षमता. हे कॅमेरे केवळ रेकॉर्डिंग करणार नाहीत, तर पोलिसांच्या यादीत असलेल्या गुन्हेगारांचे चेहरे ओळखण्यास देखील सक्षम असणार आहेत.पुणे रेल्वे स्थानक परिसरात हे सर्व 160 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या फक्त ते सक्रिय करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चालू महिनाअखेरपर्यंत आम्ही ही एआय आधारित आणि चेहरा ओळखणारी यंत्रणा प्रवाशांच्या सेवेत सुरू करू. या उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकाची आणि प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट होईल, हा आम्हाला विश्वास आहे. असे पुणे विभाग मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी सांगितले .
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु