
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)
शहरात तीन ते चार दिवसांआधी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक पंचवटी चौकात लागल्याचे प्रकरण उजेडात आले होते. या बॅनरविरोधात आवाज उचलत इस्लामच्या प्रचाराचे फलक मुख्य चौकांमध्ये लागतातच कसे, असा प्रश्न राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिसांना विचारला होता. त्यानंतर डॉ. बोंडे यांना हैदराबादहून १५ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास धमकीचा मेल आला आहे. यात अपनी जुबांन और बयान पर सख्त काबू रखो, अशी समज देण्यात आली आहे. शनिवारी रात्री आलेल्या या मेलनंतर डॉ. बोंडे यांच्या कार्यालयाने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अस्सलाम वालेकुम डॉ. साहेब, इस्लामिक इन्फॉर्मेशनच्या विरोधात आपण जे शब्द वापरले त्यामुळे हैदराबदमधील मुस्लीमांच्या मनात आग लागली आहे. तेथीलवातावरण तापले आहे. तुमच्या बोलण्याने आमच्या मजहबी गैरतला मोठा धक्का बसला आहे. तो राग आता आमच्या लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून ज्येष्ठ, तरुण, युवकांच्या मनावर आता ताबा राहिला नाही. आपण आग लावली तिचा धूर आता दाट झाला आहे. ही आमच्यासाठी जखम असून तिच्या वेदना जाणवत आहेत. त्यामुळेच तुम्ही तुमच्या जिभेवर आणि विधानांवर संयम ठेवा. कारण, यावेळी आम्हाला स्वत:ला आवरणे कठिण झाले आहे. यापुढे एकही चुकीचा शब्द वातावरण बिघडवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे. शेवटी हैदराबादची नाराज मुस्लीम बिरादरी असा उल्लेख आहे. मेलमध्ये हैदराबादी भाषेची ढब स्पष्टपणे दिसून आली आहे. आपने जो आग लगाई है, उसका धुआँ बहुत गाढा हो चुका है, असे शब्द मेलमध्ये आहेत. मेल पाठवणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मी माझे कर्तव्य करीत आहे
मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून जे माझे कर्तव्य आहे. माझ्या वक्तव्याचा हैदराबाद येथील लोकांना त्रास झाला त्यासाठी मी काय करू शकतो? मी बॅनरविरोधात आवाज उठवला, बस एवढेच.
- डॉ. अनिल बोंडे, राज्यसभा खासदार.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी