
रायगड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज शहरात प्रचंड राजकीय उत्साह आणि हलचल पाहायला मिळाली. सकाळपासूनच सर्व प्रमुख पक्षांनी रॅली, मोटारफिरत्या, ढोल-ताशे आणि घोषणाबाजीच्या माध्यमातून आपले उमेदवार अर्ज भरताना जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांतील प्रत्येकी दोन जागांसाठी एकूण २० जागांवर उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)–भाजपा युतीने दमदार ताकद दाखवत नगराध्यक्ष पदासाठी श्री. जितेंद्र सातनाक यांनी अर्ज दाखल केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी आणि रॅलीतील उत्साह लक्षवेधी ठरला.शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी स्वतंत्र लढाईची भूमिका स्पष्ट करत सर्व प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सौ. अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दाखल केलेला अर्ज दिवसभर चर्चेचा विषय ठरला. तालुक्यातील जनसंपर्कातून पक्षाने आपले स्वतंत्र बळ दाखवण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व काँग्रेस यांच्या आघाडीने १४ जागांवर उमेदवारी निश्चित केली असून नगराध्यक्ष पदासाठी श्री. अतुल चौगुले यांनी अर्ज भरला. आघाडीने प्रचार मोडला सुरूवात केल्याचेही चित्र दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही आपले उमेदवार उभे केले असून स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह विशेष जाणवला.
यासह, अपक्ष म्हणून पत्रकार अमित रामचंद्र घोडमोडे यांनी दिलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत आणखी रंगत वाढली आहे.
आजच्या शक्तीप्रदर्शनानंतर श्रीवर्धनमध्ये खरी लढत कोणत्या पक्षात होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान वर्चस्व टिकणार की जनतेचा कौल बदल घडवणार? याचे उत्तर निकालांच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके