
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
शिवसेनेत फुट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. अशातच राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते. बाबाजी काळे म्हणाले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. “त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पण ही युती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बाबाजी काळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत आहोत,” असेही बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु