
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। रेवदंडा एसटी बसस्थानकातील खड्डे, उभ्या पाण्याचे डोह आणि बेशिस्तपणे करण्यात येणारी वाहन पार्किंग व्यवस्था यामुळे प्रवासीवर्गांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बसस्थानकातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्याकडे एसटी प्रशासनाचे सुरू असलेले दुर्लक्ष यामुळे या परिसरात कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अलिबाग, मुरूड आणि रोहा या तिन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी रेवदंडा एसटी बसस्थानक आहे. दररोज मोठ्या प्रमाणात बसची ये-जा होत असल्याने प्रवासी आणि नागरिकांची वर्दळ कायम असते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडले. पावसाचे पाणी साचून या खड्ड्यांत तळी तयार झाली होती. आता पाऊस ओसरल्यानंतर हे खड्डे स्पष्ट दिसू लागले असून बसचालकांना त्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांमुळे एसटीतील प्रवाशांना धक्के बसून नाहक त्रास सोसावा लागत असल्याची तक्रार केली जात आहे.याशिवाय, बसस्थानकाच्या आवारात लहान-मोठी वाहने बेशिस्त पद्धतीने उभी केली जात असल्याने एसटी बसला योग्यरीत्या वळणे किंवा थांबणे कठीण जाते. अनेकदा या अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. खड्डे चुकवणे आणि पार्किंगच्या गोंधळातून बस चालवणे हे चालकांसाठी आव्हान ठरत असून त्यामुळे अपघाताची शक्यता आणखी वाढली आहे.
प्रवासीवर्गाने बसस्थानकातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्ड्यांची भर घालून पुन्हा रस्ता तयार करावा आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी एसटी प्रशासनाकडे केली आहे. मात्र या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आणि ग्रामस्थांत नाराजी वाढत आहे. रेवदंडा बसस्थानकाची दुरवस्था कायम राहिल्यास गंभीर अपघात अपरिहार्य असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके