
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)
अमरावती शहराच्या पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने 'माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमरावतीचा अधिकृत 'शहराचा पक्षी' (सिटी बर्ड) निवडण्याची प्रक्रिया आजपासून (१८ नोव्हेंबर) सुरू झाली असून, अमरावतीकरांना ऑनलाईन मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या पक्ष्याची निवड करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.
३८व्या महाराष्ट्र पक्षीप्रेमी परिषद व तिसऱ्या अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलनानंतर आता या उपक्रमाला मूर्त स्वरूप येत आहे. अमरावती शहराच्या ओळखीशी सुसंगत आणि येथील पर्यावरणात सहज आढळणाऱ्या सहा पक्ष्यांची नावे 'शहराचा पक्षी' उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली आहेत.
'शहराचा पक्षी' (सिटी बर्ड) निवड प्रक्रिया आणि उमेदवार
अमरावती महानगरपालिकेने वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या 'वाइल्डलाईफ एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (WECS)' च्या सहकार्याने खालील सहा पक्ष्यांची यादी अंतिम केली आहे. हे पक्षी अमरावती शहराच्या जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतात:
१. राखी धनेश : अमरावतीतील मोठ्या, जुन्या झाडांवर सहज दिसणारा राखी धनेश फळे खाऊन बीजप्रसार करतो. त्यामुळे त्याला जंगलाचा शेतकरी म्हणतात.
२. तांबट : उक्क-उक्क असा घुमणारा आवाज करणारा तांबट वड, उंबर, पिंपळ यांच्या फळांवर विशेषतः दिसतो. छोटा पण रंगीबेरंगी असा हा शहरातील परिचित पक्षी आहे.
३. हुदहुद : डोक्यावरील तुरा आणि वाकलेली चोच यामुळे सहज ओळखता येणारा हुदहुद मोकळ्या जागांवर दिसतो. अमरावतीच्या अनेक भागात तो सहज भेटतो.
४. ठीपकेवाला पिंगळा : लहान, ठिपकेदार आणि सर्वत्र आढळणारा हा पिंगळा उंदीर व सरडे खाऊन शेतीसाठी उपयुक्त ठरतो. तो जुन्या झाडांमध्ये आणि वाड्यांत आश्रय घेतो.
५. शिक्रा : निळसर राखाडी रंगाचा आणि नारिंगी रेषांनी उठून दिसणारा शिक्रा एक तडफदार शिकारी पक्षी आहे. शहरातही सहज दिसतो आणि अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.
६. भारव्दाज - लांब शेपूट, विटकरी पंख आणि लाल डोळे असलेला भारव्दाज हिरवळीत हमखास दिसतो. डोमकावळ्यासारखा दिसत असला तरी निळसर झाक त्याला वेगळेपण देते.
मतदानाचे वेळापत्रक आणि आवाहन
या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये पक्षीसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी जाहीर केले की, अमरावतीकरांना मतदानासाठी खालीलप्रमाणे कालावधी देण्यात आला आहे:
मतदान कालावधी: १८ नोव्हेंबर २०२५ ते २८ नोव्हेंबर २०२५
निकाल घोषणा: ३० नोव्हेंबर २०२५
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावतीकरांना आवाहन केले की, आपल्या शहराच्या पर्यावरणाचे प्रतिनिधित्व करणारा पक्षी निवडण्याची ही एक अनोखी संधी आहे. नागरिकांनी या निश्चित वेळेत जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्या पसंतीच्या 'शहराच्या पक्षी' ला मत द्यावे आणि या ऐतिहासिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.
टीप: मतदानासाठी ऑनलाईन पोर्टलची लिंक अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया हँडलवर आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.हा उपक्रम अमरावती शहराच्या पर्यावरणपूरक प्रतिमेला नवा आयाम देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी