
चुराचांदपूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी प्रतिबंधीत युनायटेड कूकी नॅशनल आर्मी (यूकेएनए) या संघटनेचे 4 उग्रवादी एका चकमकीत ठार केले. ही घटना आज, मंगळवारी पहाटे 5.30 वाजता सुरू झालेल्या शोध मोहिमेदरम्यान घडली. यूकेएनए हा असा एक गट आहे, ज्याने केंद्र आणि राज्य सरकारसोबत झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी केली नव्हती. सध्या पळून गेलेल्या उग्रवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरूच आहे.
चुराचांदपूरमध्ये सुरक्षा दलांना खानपी गावाजवळ उग्रवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता या परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत हे उग्रवादी ठार झाले. ऑपरेशनविषयी माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि उग्रवादी यांच्यात गोळीबार सुरू झाला होता. त्यात अनेक उग्रवादी जखमी झाले, तर 4 जण ठार झाले. मात्र, काही जण गोळीबाराच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाले.
चकमकीनंतर सैन्याने निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली आहे. चकमकीनंतर पळून गेलेल्या उग्रवाद्यांच्या शोधासाठी परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दल सर्व उग्रवाद्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी