
रायगड, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) महायुतीसोबत लढणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. मात्र, ज्या ठिकाणी पक्षाला समाधानकारक जागा मिळणार नाहीत, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करून विजय मिळवेल, असे ते म्हणाले.
महाड येथे चांदे मैदानावर आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या ६९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद दिला. परिवर्तन कला महासंघाच्या कलाकारांनी सादर केलेल्या भिमगीतांनी वातावरण भारले.
सभेपूर्वी आठवले यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते, तर सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. त्यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचे “अमृतसर गोल्डन टेंपल”च्या धर्तीवर सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.
आठवले म्हणाले, “रिपब्लिकन पक्ष फक्त बौद्ध समाजापुरता मर्यादित नसून सर्व जातीधर्मीयांचा पक्ष आहे. प्रत्येक गावात पक्षाची शाखा स्थापन करा आणि निळा झेंडा फडकवा.” त्यांनी २०२७ मध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रम घेण्याची घोषणाही केली.
कार्यक्रमस्थळी सीमाताई आठवले, जीत आठवले, अविनाश महातेकर, बाबुराव कदम, प्रकाश मोरे, नरेंद्र गायकवाड, पप्पू कागदे, सिद्धार्थ कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके