स्मार्ट मीटर विरोधात संतापाची लाट, नागरिकांचा वीज वितरण कार्यालयावर घेराव, आंदोलनाचा इशारा
अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.) नांदगाव पेठ मध्ये काही महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीतर्फे जबरदस्तीने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या मीटरमुळे वीज बिलात झालेली प्रचंड वाढ आणि वीज कर्मचाऱ्यांची अरेरावीची व
स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट, नागरिकांचा वीज वितरण कार्यालयावर घेराव तात्काळ मीटर बदलण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा


अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)

नांदगाव पेठ मध्ये काही महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीतर्फे जबरदस्तीने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या मीटरमुळे वीज बिलात झालेली प्रचंड वाढ आणि वीज कर्मचाऱ्यांची अरेरावीची वागणूक यामुळे आज संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत कार्यालयाला घेराव घातला. गावातील अनेक घरांमध्ये जिनियस कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, यापूर्वी एक हजार रुपयांच्या आसपास बिल येणाऱ्या ग्राहकांना आता चार ते पाच हजार रुपयांचे बिल येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “हे मीटर चुकीचे आहेत; कंपनी आणि वीज वितरण मंडळ मिळून ग्राहकांची फसवणूक करत आहे,” असा आरोप नागरिकांनी केला.तक्रारीनंतरही वीज वितरण अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी आज कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी केली. काही कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी अरेरावीच्या भाषेत वागणूक देण्यात येत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. यावेळी अभियंता गजानन बेहरे यांना निवेदन सादर करून नागरिकांनी स्मार्ट मीटर तातडीने बदलण्याची मागणी केली. “स्मार्ट मीटर लगेच बदलले नाहीत, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन करतील असा इशारा अमोल व्यवहारे, संजय इंगळकर, पंजाबराव सुंदरकर, नामदेव इंगोले, संदीप दुधे, ज्ञानेश्वर राऊत, सुनील जवके आणि रमेश जवके यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.नागरिकांच्या या तीव्र आंदोलनामुळे वीज वितरण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्मार्ट मीटरचा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande