
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यापासून बहु प्रतीक्षित कार्यकारिणी जाहीर झाली नव्हती. आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.संघटनदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर मोहोळचा तरुण चेहरा विकास वाघमारे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर अक्कलकोट मधून प्रदीप पाटील तर मंगळवेढ्यातून संतोष मोगले यांना संधी दिली आहे.यासोबतच ९ उपाध्यक्ष, ८ चिटणीस, १ कोशाध्यक्ष यासह ६२ कार्यकर्त्यांना सदस्य पदावर संधी दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे महेश बिराजदार तर ओबीसी मोच्या जिल्हाध्यक्ष पदी उत्तर सोलापूर मधून विनायक सुतार यांना संधी मिळाली आहे.
आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेचे महत्त्व लक्षात घेता या कार्यकारिणीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी जिल्हाध्यक्ष असताना असलेल्या सरचिटणीस पदावरील विकास वाघमारे वगळता इतर कोणालाही संधी मिळाली नाही.आगामी काळात सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे, हे सर्व शिलेदार घेऊन भारतीय जनता पार्टीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड