
रायगड, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। रोहा–रामराज मार्गाला अलिबागशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वडाव गावाजवळील पूल आज दुपारी अचानक कोसळला. या घटनेमुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराला सुरक्षा फिती लावून बंदिस्त करण्यात आले आहे. पूल कोसळल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वाहतूक वळवून रोहा–रेवदंडा किंवा पाली मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
पावसामुळे पूलाची पायाभरणी कमजोर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पूलाची पाहणी सुरू आहे. दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी तातडीने काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला पूलाच्या जीर्ण अवस्थेबद्दल पूर्वी अनेकदा कळवले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सध्या वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके