
छत्रपती संभाजीनगर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराबाबत माहिती जिल्हा प्रशासनास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी व त्यातून जिल्ह्यात होत असलेली सामाजिक कामांची माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे व उद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात कार्यरत असलेले उद्योगांनी आपला सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग कुठल्या क्षेत्रात केला जात आहे. तसेच त्यातून कोणती कामे करता येऊ शकतात, आगामी वर्षात अशा निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन याबाबत एकत्रित जिल्हा प्रशासनाकडे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगाने आपल्या निधीवापराबाबतची माहिती द्यावी. जेणेकरुन जिल्ह्यातील नेमकी आवश्यकता असलेल्या भागात हा निधी वळवून या निधीचे नियमन करणे शक्य होईल. तरी सर्व उद्योगांनी याबाबतची माहिती सादर करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis