
छत्रपती संभाजीनगर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)।दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचे वैशिष्ट्य. दिवाळीचा खमंग फराळ, आकाशदिवे, फटाके, फुलबाज्या, आप्तेष्टांच्या भेटीगाठींसोबतच मराठी मन दिवाळी अंकांसाठी उत्सूक असते. ह्याच दिवाळी अंकांचे प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालयात विनामूल्य सुरु आहे. दि.१० नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन वाचकांसाठी खुले राहणार आहे, असे छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी कळविले आहे.
समर्थ नगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.विष्णू सुरासे यांचे हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत गौतम अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर सेवेकर, अण्णा वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक गुलाबराव मगर, पी.यू. जैन शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटोदी हे उपस्थित होते.
दिवाळी अंक केवळ मनोरंजनच करीत नसून ते विविध विषयांचे, पैलूंचे ज्ञान देणारे साहित्य असून त्यांच्या वाचनाचा आनंद हा अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत गौतम यांनी केले.
प्रा. सुरासे यांनी दिवाळी अंकांचे व वाचनाचे महत्त्व विषद करून वाचन मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी याप्रसंगी हलक्या फुलक्या विनोदाने कार्यक्रमास रंगत आणली.
हे प्रदर्शन विनामूल्य असून विविध विषयांवरील दिवाळी अंकरुपी फराळाचा वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले.
या कार्यक्रमास शासकीय विभागीय ग्रंथालयाचे वाचक, सभासद तसेच शहरातील पी.यु.जैन शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे यांनी केले. दिवाळी अंकांचे हे प्रदर्शन दि.१० नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असून वाचनप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis