
कोल्हापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत परिषद सदस्यांनी अलीकडे वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरात कपात करण्यात आली असतानाही बाजारपेठेत अनेक वस्तूंची विक्री अद्याप जुन्या (जास्त) दरानेच होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या अनियमिततेमुळे जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांना प्रत्यक्षात मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी व सेवा प्रदात्यांनी त्यांच्या दुकानांवर जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीचे जुने आणि नवीन दर दर्शवणारा फलक ठळकपणे लावणे बंधनकारक असून नवीन दरांची तात्काळ अंमलबजावणी करून ग्राहकांना अचूक बिल देणे आणि दरकपातीचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
ग्राहकांनी खरेदी करताना बिलावर नमूद जीएसटी दर तपासावा, तसेच दराबाबत शंका किंवा तक्रार असल्यास स्थानिक जीएसटी कार्यालय अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. शासनाच्या या ग्राहक हितकारी निर्णयाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून दरकपातीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जि.ग्रा.सं.प. सदस्य सचिव मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar